डिमेंशिया/अल्झायमर्सच्या रुग्णांची काळजी घेणे आव्हानात्मक असते हे आपण सर्व जाणताच. काळजी घेता घेता जशी रुग्णाच्या वागणुकीतील बदलांमुळे वेगवेगळ्या प्रश्नांची ओळख होत जाते तसे रुग्णाशी कसे वागावे म्हणजे आयुष्य शांतपणाने जगता येईल? असा प्रश्न पडत जातो. ह्यामुळे होणारी भावनिक आणि शारीरिक ओढाताण काळजीवाहकापुढे अनेक आव्हाने उभी करते. अशावेळी आपल्या मनातले कोणाला सांगावे हे कळत नसते आणि कोण मार्गदर्शन करेल हे उमगत नसते.
ह्या समयी कोण मदत करणार? ह्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच सपोर्ट ग्रुप आहे. सपोर्ट ग्रुपच्या मिटींग्सना मनातले बोलता येते, विचारांची देवाण घेवाण होते. ह्या देवाणघेवाणीतून आम्हा सभासदांना डिमेंशियाच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी ह्याचे जे मर्म सापडले त्याचे निवेदन आम्ही ह्याठिकाणी करणार आहोत.
- अगदी सुरुवातीला सगळ्यात महत्वाचा सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे रुग्णाच्या भावनांची कदर करा. त्यांच्या आजारपणाला भिऊन त्यांचे आयुष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्न करु नका. सुचना करुन गोष्टी बदलणार आहेत का? असा प्रश्न दर वेळी स्वतःला विचारा.
- रुग्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा ते काय म्हणत आहेत ते शांतपणाने, लक्षपूर्वक ऐका. त्यासाठी –
-
- ऐकतांना डोळ्याला डोळे भिडवा
- त्यांचे बोलणे पूर्ण होई पर्यंत थांबा
- जेव्हा शब्द भावना व्यक्त करायला असमर्थ होतात तेव्हा त्यांच्या बोलण्यामागच्या भावना समजून घ्या
वाद घालू नका. क्षुल्लक गोष्टीत वाद घातल्याने सभोवतालच्या परिस्थितीत थोडाच बदल होतो? उदा. गवत पिवळे असते की हिरवे? मेणबत्ती गोल असते की चौकोनी? अशा प्रश्नांच्या बाबतीत काय बरोबर?
- काय चूक? ह्यात काय फरक पडतो! अशा संभाषणाची मजा घ्या. अर्थातच जेव्हा प्रश्न इतके साधे, सरळ नसतात अशा वेळी संभाषणाचा विषय बदला. अशा व्यक्तीशी संवाद साधतांना त्यांच्या आवडत्या विषयावर, आवडत्या वस्तूवर संभाषण केले तर त्यांना ते आवडते. दुसर्या कशात त्यांचे मन रमविण्याचा प्रयत्न शक्य नसला तर, मी बघते काही जमले तर, काहीतरी जमवण्याचा प्रयत्न करते असे आश्वासन देऊन टाका.
- डिमेंशियाच्या रुग्णांना भावना शेवटपर्यंत समजतात. तुमचे शब्दच नाही तर तुमच्या चेहेर्यावरच्या भावनादेखील त्यांना टिपता येतात त्यामुळे तुम्ही त्यांना दुःख देता आहात की आनंद हे त्यांना समजते. म्हणूनच आपण त्यांच्याशी कुठल्या सुरात बोलतो ह्यावर रुग्णाचा आपल्याशी संवाद कसा असेल हे अवलंबून असते
-
- डिमेंशियाच्या रुग्णाची काळजी घेतांना आपल्या अंर्तमनातील प्रेमाला साद घातल्याशिवाय काळजी घेणे जमू शकत नाही हा अनुभव तुम्हा सर्वांना असेलच. त्यासाठी शारिरीक आणि मानसिक कसरती रोजच्या रोज चालू असतात. परंतु काळजी घेण्याचे तंत्र शिकून, प्रेमाची उब देऊन आणि शक्य तिथे बाहेरची मदत घेऊन ही परिस्थिती कशी हाताळावी म्हणजे जीवन शक्य तितके नॉर्मल होऊ शकेल ह्याचा अंदाज हळुहळू यायला लागतो.
- आजाराच्या सुरुवातीच्या काळात रुग्णाकडून काहीतरी अयोग्य, असंभवनीय बोलणे बरेच वेळा होत असते. कारण आजारी व्यक्तिचे जगच असे रुप पालटत असते. तेच त्यांचे वास्तव झालेले असते. त्यांचे अजब बोलणे ऐकतांना त्यांची चूक दाखवणे, नव्हे त्यांचे बोलणे कसे अतार्किक आहे हे त्यांना पटवून देणे ह्यात आपण आपला पुरुषार्थ मानत असतो. परंतु कसेही सांगीतले तरी रुग्णाला पटवून देणे शक्य नसते. त्यामुळे काळजीवाहकाची सरशी होण्याची शक्यता नसते. अशा वेळी त्यांना दिलासा देऊन, त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या कल्पनाविश्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याचा फायदा होतो. रुग्णाच्या संभाषणाची गाडी सगळ्यांना आनंदी करणार्या विषयावर आणल्यास सगळ्यांनाच ते सुखावह होते.
- डिमेंशियाच्या रुग्णाचा मेंदू सामान्य माणसाचा राहिलेला नसतो. त्याची पडझड सारखी चालू असते. तेव्हां त्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्याशी संवाद साधणे महत्वाचे असते. लहान मुलाशी बोलतांना आपण त्याला मांडीवर उचलून घेतो किंवा त्याच्या उंचीचे होण्याचा प्रयत्न करुन त्याच्याशी बोलतो तसेच. रुग्णालाही आपल्या कमी होणार्या क्षमतेची जाणीव असते आपल्या दुबळ्या मेंदूकडून शक्य तेवढे सहकार्य मिळवण्याचा त्याचाही आटोकाट प्रयत्न चालू असतो. मेंदू थकला असला तरी आतला माणूस तोच आहे हे आपणही लक्षात ठेवायला हवे.
- ह्या परिस्थितीत रुग्ण आणि काळ्जीवाहक दोघांनाही वैफल्य येणे, अस्वस्थता वाटणे साहजिक असते. परंतु तरीही रुग्णाकडून ओढून ताणून, जबरदस्ती करुन काही गोष्टी करवून घेणे हा मार्ग वापरणे ठीक नसते. खरे तर कळत नकळत अशी जबरदस्ती आपल्याकडून होत असतेच. पण शांतपणा ठेवून, परिस्थिती स्वीकारुन जेव्हा आपण त्यांना स्वीकारतो, त्यांच्याशी हळुवार पणाने वागतो, त्यांची इच्छा असेल त्या विषयावर बोलतो, त्यांना आवडतील अशा गोष्टी करतो तेव्हा त्यांच्यातील आणि आपल्यातील तुटलेला धागा पुन्हा जोडला जाऊ लागतो. आपले आत्तापर्यंतचे संबंध कसे होते आणि ते पुढे चांगले असावेत ह्यासाठी काय करायला हवे ह्याचा विचार आपण करु लागतो.