माझे मनोगत – सौ. आसावरी श्रीरंग यज्ञोपवीत
मी कोणी लेखिका नाही. पण माझे चार अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करुन माझ्या डोक्यातील वादळाला वाट करुन देते आहे. मला क्षमा करा.
स्वर्ग दोन बोटें उरणं म्हणजे काय असे वाटण्यासारखे माझे आयुष्य होते. पण एक त्सुनामि आली किंवा मोठे वादळ आले की भलाथोरला वटवृक्ष सुद्धा निष्पर्ण होतो. असेच अक डिमेंशियाचे वादळ माझ्या नवर्याच्या जीवनात आले आणि त्यांच्या आठवणींची पानगळ सुरु झाली.
ज्यावेळी ह्यांना डिमेंशिया आहे असे डॉक्टरांनी सांगीतले तेव्हा खरेच मला काही कळले नाही तोपर्य़ंत डिमेंशिया अल्झायमर्स हे शब्दही कधे एऐकले नव्हते. मग डॉक्टरांनी समजावले स्मृतीपटल हे एक पोस्टर आहे असे समजा त्याचे पोपड एपडायला सुरुवात झाली आहे. ते थोडे विद्रुप वाटते आहे पण जे शिल्लक आहे त्याला औषधाच्या, प्रेमाच्या, व्यायामाच्या सोल्युशनने चिकटून ठेवण्याचा प्रयत्न करु या. मग त्या साठी औषधांबरोबर दीनानाथ हॉस्पीटलमध्ये मेमरी लॅबला जायला सुरुवात केली. स्मरणशक्तीचे विविध व्यायाम, खेळ, लिहीणे, वाचणे इत्यादी सुरु झाले जेणेकरुन डोळे, हात, मेंदू एकाच वेळी काम करेल असे पाहिले जाऊ लागले. शारिरीक व्यायामासाठी फिरणे चालू होतेच.
डिमेंशिया मुळे माणसाचे व्यक्तीमत्व पूर्ण बदलते. हे अत्यंत शिस्तीचे आहेत म्हणजे होते. कपड्यांच्या घड्या इस्त्रीसारख्या करुन टुरवरुन आणत. अक्षर छापल्यासारखे सुंदर. सगळे महत्वाचे कागद व्यवस्थित ठेवत. असे किती सांगावे? आत्ता या क्षणी ह्यातले काही शिल्लक नाही.
हे A.G. M. होते. आमच्या चौदा वेळा बदल्या झाल्या. खूप ओळखी. घरी माणसांची रीघ लागलेली असायची. आता कोणी घरी आले तर हे बोलतीलच अशी खात्री नाही. आलेले माणूस चला म्हणाले की स्वतःच चप्पल घालून दाराबाहेर. त्यांचा निरोप घ्यायला जातील पण त्यांना अजून चहाही दिलेला नाही हे लक्षात येणार नाही.
त्यांना दररोज बागेत फिरायला घेऊन जाते. जर कोणी ओळखीचे वाटले तर त्याला विचारतील कसे काय? तब्येत कशी आहे? तो माणूस गोंधळून जातो. पण त्यांना भेटायला येणारा प्रत्येक माणूस त्यांना हेच प्रश्न विचारतो. त्याचा हा परिणाम हे माझ्या लक्षात आले.
त्यांच्या व्यक्त न होण्याने मी डॉक्टरना नेहेमी विचारायची ह्यांना सुख दुःख काळजी चिंता काही नाही का? डॉक्टर म्हणाले सगळे असते पण ते व्यक्त करत नाहीत कारण त्यांना शब्द सापडत नाहीत. त्याचवेळी माझ्या वाचनात एक गोष्ट आली. गोष्ट परदेशातील आहे. एक जोडपं सुखी होते. रीतायर्ड आयुष्य़ आनंदात जगत होते. मुलांची लग्न झाली. नातवंड आली. आणि एक दिवस एक वावटळ आली. नवर्याला अल्झायमर्स आहे असे कळले. प्रकृती खालावली. पानगळ जोरात सुरु झाली. आजोबांना हॉस्पीटलमध्ये ठेवावे लागले. बायको रोज तिथे जायची. कधी कधी मुले नातवंडही यायची. बघता बघता पंचाहत्तरावा वाढदिवस आला. वॉर्डला फुगे लावले. केक, चॉकलेट, फुलं, भेटकार्ड – वाढदिवस जोरात साजरा झाला. आणि दुःखाचे गोष्ट ही की त्याच रात्री आजोबा गेले. सकाळी सगळ्या सामनाची आवराआवर झाली. त्यावेळी उशीखाली एक भेटकार्ड सापडले जे आजींनी आजोबांना दिले होते. उघडून पाहिले तर त्यात आजींच्या नावाखाली थरथरत्या हातांनी लिहीलेले होते- I love you !!
आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. वाटले वादळाने सगळे झाड निष्पर्ण केलेले नाही. एक कोंब फुटतो आहे की! असे बघा- एक गोळी तोंडात टाकतील अन मला विचारतील तू खाल्लीस का? तुला साडी घ्यायची का? नातू सून मुलगा दिसले नाहीत की कुठे गेले असा ध्यास घेतील. आणि अशा प्रश्नांमधुन त्यांच प्रेम कुठे हरवलेले नाही तर अंतरंगात लपून बसले आहे ह्याची मला जाणिव झाली.
2004 साली एका मोटर सायकलने जाणार्या युवकाने ट्युशनला जायच्या घाईत ह्यांना सकाळी सकाळी उडवले. दुसर्या दोन मुलांनी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यापासून घरी कळवण्यापर्यंत सगळे केले. त्यावेळी मेंदूला जखम आहे हे कळले तोवर डिमेंशियाची सुरुवात झाली होती. मध्ये चार वर्षे गेली. पडझड चालू झाली. निरर्थक फिरणे चालू झाले.
पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणे, प्रश्न विचारणे, न सांगता बाहेर जाणे, वेळेवर न येणे, मी रिक्षाने आलोच नाही म्हणून रिक्षावाल्याला दारात उभे करुन ठेवणे, रात्री दहा वाजेपर्यंत नळस्टॉपवर हाताची घडी घालून अस्वस्थपणाने इकडे तिकडे पहात फिरणे हे सर्व त्यांच्या एकटे बाहेर जाण्याला प्रतिबंध करायला पुरेसे होते. मग शक्यतोवर दुखर्या गुडघ्याने माझी वरात त्यांच्या बरोबर जाऊ लागली.
आणि एकदा तो दिवस आला. 21 नोव्हेंबर 2010. माझ्या वडिलांचा नव्वदावा वाढदिवस. माझ्या सार्या माहेरच्या नातेवाईकांनी मिळून साजरा केला. ह्यांनीही कार्य्क्रमात सहभाग घेतला होता. संध्याकाळचे सहा वाजले. आमची रोजची फिरायला जायची वेळ. मी खूप दमले होते. सगळे आपापल्या घरी गेले. सूनही दमली होती. अचानक मुलाच्या अंगात ताप भरला. औषध देत होतो. तोच हे आले कपडे बदलू? जायचं ना? मी म्हटले आज राहू द्या. घरी व्यायाम करा. पाय खूप दुखत आहेत. परत तोच प्रश्न. – सहाव्यांदा प्रश्न आला. कपदे बदलू? मला राग आला त्या भरात मी म्हटले – मी मेले तर सहा वाजता फिरायला जाऊन मग मला उचलाल!—जा तुम्हाला जायचे आहे ना? जा, काय करायचे ते करा पण लवकर या.
त्याक्षणी ह्यांनी चप्पल घातली आणि बाहेर गेले. आणि तत्क्षणी मला जाणवले माझे वागायला आणि बोलायला चुकले होते. पश्चातबुद्धी! आता सर्वस्वी माझी जबाबदारी होती. पावणेसात वाजता बेल वाजली. धावत जाऊन दार उघडले. हे वेळेवर घरी परत आले होते. माझा जीव भांड्यात पडला. मला पाहिल्या बरोबर हे म्हणाले, पाय फार दुखतोयं का? माझे डोळे अश्रुंनी भरले होते.
लग्नाच्या वाढदिवसाला दरवेळी नाशिकची सून चित्रपटाची तिकीटे द्यायची. एकदा असाच एक चित्रपट पहातांना हे कंटाळले. मध्येच म्हणाले, ह्या चित्रपटाला मध्यंतर नाही का? जे नुकतेच होऊन गेले होते. आपण पुण्यात आहोत की नाशिकमध्ये ह्याबाबत गोंधळतात. पूण्याहून कोल्हापूरला चाललोय की कोल्हापूरहून पुण्याला चाललोय त्यांना समजत नाही. पुण्याचा मुलगा मुंबईला बदलून गेला आहे आणि नाशिकचा मुलगा तळेगावला आलेला आहे हे त्यांच्या अजिबात लक्षात रहात नाही. त्यांच्या जुन्या गाड्या त्यांना आठवतात. त्यांच्या मित्रांची कधी आठवण काढतात. पण भेटले तर त्यांना ओळखण्याची खात्री नाही.
अमुक एक गोष्ट मला आवडते असे सांगत नाहीत. पण गोड पदार्थ शोधून खातात. गाडीत बसून फिरायला आवडते. पुढे बसण्यासाठी नातवाशी भांडाभांडी करतात. तोच नातू त्यांना रागावू नको गं ते विसरतात ना? अशी माझी समजूत घालतो.
कधी लग्नकार्याला जावे तर पाच मिनिटात येतो म्हणून बाहेर जातात. शोधायला मग दोन चार तासही जायचे. मग लोकही अरेरे! राजाचे हे काय झाले म्हणून दुःख करणार ज्याने त्याने मला येऊन सांगायचे हा तर पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारतो. मग डिमेंशियाची चर्चा फुकट सहानुभूती व सल्ले. हळु हळू प्रत्येक कार्यक्रमाला जायची गरज नाही असे ठरवले. कधी कधी जातो हं! फक्त ह्यांना अजिबात एकटे सोडत नाही. सकाळ संध्याकाळ फिरायला जाण्याची चैन करतो. नाशिक पुणे कोल्हापूर असा प्रवास करतो. पण ह्या दरम्यान मी नवरा होते. चाळिस वर्षे ह्यांनी सगळे संभाळले. आता माझी पाळी.
प्रवास म्हटल्यावर एक गोष्ट आठवली. गेल्या वर्षी माझा मुलगा आम्हाला केरळला घेऊन गेला. कोकण रेल्वेचा प्रवास पनवेलहून निघालो. रात्रभर प्रवास झाला. खालच्या बर्थवर हे व मी, वर सून आणि मुलगा झोपले होते. मुलाला मध्ये कधीतरी जाग आली. तो म्हणाला आई बाबा कुठे आहेत? चालती गाडी पहाटेचे चार वाजलेले. नशीबाने गाडीचे डबे एकमेकांना जोडलेले होते. हे पलिकडच्या बोगीत एका रिकाम्या बर्थवर झोपलेले आढळले. कारण त्यांना त्यांचा स्वतःचा बर्थ सापडत नव्ह्ता जो टॉयलेटपासून फक्त दहा पावलांवर होता. तेव्हापासून दोघांनी करायचा प्रवास कोथरुडपासून सुरु होऊन कोथरुडलाच संपतो.
तुम्ही टी.व्हीवर एक जाहिरात पाहिली आहेत का? एक नवरा बायको प्रवासाला निघतात. विविध प्रकारचे पकोडे तळतात. त्या नादात गाडी चुकते. नवरा चिकाटीने म्हणतो उद्या पनीर पकोडे विकत घेऊन येऊ. तसे निवृत्त झाल्यावर कसा जगप्रवास करायचा काय काय पहायचे ह्याचे आम्ही खूप बेत केले अर्थात पकोडे तळले. पण आमची ट्रेन नियतीने चुकविली. पण मी निराश झालेली नाही. कारण सहजपणे रस्ता ओलांडावा इतकी आयुष्य़ाची वाट साधी, सरळ नसते हे मला कळले आहे.
माझ्या मैत्रिणी एकत्र जमल्या की आपण रीटायर्ड आयुष्य कसे मजेत जगतो आहोत ते सांगतात. एक म्हणते आम्ही दोघे आता मित्र आणि मैत्रिण झालो आहोत. मागचे दिव्स आठवतो. पुढचे बेत दोघांनी मिळून करतो दुसरी म्हणते. तिसरी नातवंडांचे मोठे होणे पहात रहाते. कोणाचा वादे वादे संवाद चालतो. मी फक्त ऐकत रहाते कारण ह्यांची आई होण्याची भुमिका निवृत्त आयुष्यात मला निभवायची आहे (आनंदात)
आता मी ठरविले आहे आपल्या वाट्याला आलेले काम करत रहायचे. मनासारखे फलित मिळेलच असे नाही. मिळाले नाही तर फार फार तर वाईट वाटेल पण त्याला भिऊन लढाईला घाबरायचे नाही. दीनानाथची मेमरी लॅब, सपोर्ट ग्रुप दोघांचा खूप फायदा होतो. ह्या वाटचालीत मोठा आधार मिळतो. हल्ली कधीतरी माझा ह्यांचा थोडा थोडा संबाद होतो. अर्थात समोर दिसणार्या गोष्टीबाबतच. पूर्वीपासून ह्यांचा स्वभाव शांत आहे. घरात आरडा ओरडा ह्यांना पसंत नसायचा. त्यामुळे आता मी काही जोरात बोलले तर हे हट्ट सोडतात. माझे ऐकतात. तेव्हा मुलांना वाटते की हे मला घाबरतात. पण चाळिस वर्षे मी ह्यांना घाबरत होते हे कोणाला माहीत नव्हते.
कधीतरी वाटते पुढचे बेत, मुला नातवंडांचे कौतुक मी कोणाशी बोलू? कोणी अपमान केला, लागेल असे बोलले तर कोणाला सांगू? त्यासाठी नवरा ही एकचा जागा असते ना?
एवढी वर्षे माझ्या चिडखोर स्वभावाला ह्यांनी शांत केले म्हणायचे चिडू नको तुलाच त्रास होईल सोडून द्यायचे दुर्लक्ष करायचे ह्यांना ते जमले. पण मी संतही नाही आणि शांतही नाही. पण मी रोज प्रार्थना करते देवा मला सगळे सहन करण्यासाठी भरपूर ताकद दे आणि समजूतदार पत्नी होण्याची समजूत दे.