सकाळ उजाडली की माझे, “अहो हे करा, ते करु नका” असे बोलणे सुरु होते. एक दिवस लहान मुलगा म्हणाला, “शांतपणे घे आई”. बोलण्याने तुला त्रास होतोय. घराची शांती बिघडते आहे. खरंच हा विचार मी कधी केलाच नाही. सगळे गृहीतच धरले होते पण आज पासून मी अगदी शांत व्हायचा प्रयत्न करायचे ठरवले आहे.
टी.व्ही. वर एक जाहिरात येते. पकोडे खाण्याची आवड असणारा नवरा पक़ोडे खातो, डबा भरतो पण त्या दोघांची ट्रेन चुकते. असं काहीसं माझं झालंय! आपलं काम इमानाने, स्वतःला पूर्ण झोकून, बॅंकेत भराभर प्रमोशन मिळवून हे मोठ्य़ा पदाला पोचले. निवृत्त झाल्यावर, दोन सुना आल्यावर आपण हे करु, ते करु, जगभर प्रवास करु सगळं ठरवलं! म्हणजे ढीगभर पकोडे तळले पण कशी आमची ट्रेन निघुन गेली कळतंच नाही. फक्त मी पहात राहिले आहे.
तुम्हाला वाटेल काय झाले असे? मी आठवणींची पानगळ हे शोभा चित्र्य़ांचे पुस्तक वाचले आणि माझ्या लक्षात आले की कोणतेही आजारपण स्वीकारणे सोपे नाही. मोठ्या आजाराशी सामना करतांना सगळेजण आधी एक पाय मागे घेतात आणि ज्याला आजार असेल त्याच्या सहचराला पुढाकार घ्यायला लागतो. म्हणून ह्यांचा डिमेंशिया स्वीकारायला, जबाबदारी घ्यायला मलाच पुढे व्हायला हवे. नंतर सगळे हळुहळू पुढे येतात मदत करायला .
अगदी सुरुवातील हे जेव्हा तेच, तेच प्रश्न विचारायला लागले, तेव्हा सगळेच मला सांगायचे, “त्यात काय झालं? द्यायचं उत्तर पुन्हा, पुन्हा”. हळुहळू सगळेच प्रश्नाकडे दुर्लक्ष करायला लागले. हे सारखे बाहेर फिरायला जायचे. डॉक्टर म्हणाले, “त्यांना घरात सुरक्षित वाटत नाही का”? मग लक्षात आले नातू जवळ आला की ते का घाबरत असत ते. म्हणत “तो माझ्या अंगावर उडी मारेल. हातातल्या बॅटने मारेल. माझा चष्मा फुटेल”. मग म्हणत, “तुला तुझी आई बोलावते आहे”.
ह्यांना काय झाले आहे ते कळल्यावर शांतता भंगाची एक मोठी लाट येऊन गेली खरी. तिला मी आधी तोंड दिले आणि मग पाठही फिरवली.
लग्नाच्या वाढदिवसाला दरवेळी नाशिकला सून केक आणायची. चित्रपटाची तिकीटे आणून द्यायची. एकदा चित्रपट पहातांना म्हणाले, “ह्या चित्रपटाला इंटरव्हल नाही का”? नुकतेच होऊन गेले होते इंटरव्हल. आम्ही बाहेर चक्करही मारुन आलो होतो.
पुण्यात मुलगा मोठमोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा. पण कुठे गेलो? काय खाल्ले? सारे साफ. केरळ पाहून आलो. पण आत्ता त्यातले काहीच पाहिले नाही म्हणतात. मध्ये मोराच्या चिंचोलीला जाऊन आलो. कुठे गेलो? काय पाहिले? शून्य. खरंच काय चाललं असेल ह्यांच्या मनात? डिमेंशिया होण्यापूर्वी अंदमानला गेलो होतो, ते आठवते. सिमला कुलु मनाली पाहिले, ते आठवते. पण नंतर मालवण, आंबोली ट्रीप केली ते आठवत नाही. महाबळेश्वर, पांचगणीला दोन तीन वेळेला गेलो ते आठवत नाही. तिरुपतीला चाळिस वर्षांपूर्वी गेलो ते आठवते. पण गेल्यावर्षी तिरुपती-उडुपीला गेलो ते आठवत नाही.
मोठ्याची बदली मुंबईला झाली. ह्यांनी स्वीकारलं नाही. सारखं सुनेला विचारत रहातात, “तो आला नाही अजून”?. धाकटा तळेगावला गेला, त्याची पहिली फॅक्टरीच आठवते. तो आला की दरवेळी विचारतात “नोकरी बदलली? हो”? माझ्याबरोबर बाहेर आले आणि माझ्या आधी घरात गेले की मुले विचारतात, “आई कुठाय”? हे म्हणतात, “मला काय माहीत? माझ्या बरोबर नव्हतीच”. हळुहळू त्यांचे सख्खे मित्रही आठवेनासे झाले आहेत. पाठीमागे त्यांची नावे आठवतात. पण समोर आल्यावर हे कोण म्हटले तर “काही लक्षात येत नाही” म्हणतात. आवर्जून काही मागत नाहीत पण आईस्क्रीम, कोल्ड्रींक अजून आवडते.
माझ्या मैत्रिणी जमल्या की काही नवर्याबद्दल बोलतात तो कसा आपला मित्र झाला आहे हे एकजण सांगते तर दुसरी वादे वादे सुसंवाद कसा होतो ते सांगते. तिसरी आपण त्याच्या कलाने घेतो, अजूनही घाबरतो म्हणते तर चौथी त्यांच्या बरोबर निवृत्त आयुष्य खूप चवीने मुरलेल्या लोणच्या सारखं चोखतेय म्हणते. पण फक्त मीच त्यांची आई आहे हे मला जाणवतंय!
आता सुरु झाल्या आहेत, ऑलझायमर्स सपोर्ट ग्रुपच्या मिटींग. आपलंच दुःख़ उराशी कवटाळून न बसता आनंद शोधत लढा देणार्या कोणी, कोणी भेटल्या. दीनानाथच्या मेमरी क्लिनिकला, मेमरी लॅबला गेल्यापासून हळुहळू बोट धरुन एका दिशेला निघाल्या सारखं वाटतंय. आता मात्र ठरवलंय, कसलाही बाऊ न करता बिना पकोडे तळता ट्रेन पकडायला जायचं. इतरांना तोल संभाळायला जमतं तर मला का नाही? समजूतदार पत्नी होण्यासाठी, देवा, मला ताकद दे. सहनशीलता दे.