आमचे आयुष्य विंचवाच्या पाठीवर बिर्हाड अशाच प्रकारचे होते. एअरफोर्स ची नोकरी त्यामुळे दर तीन वर्षांनी बदल्या होत असत. 1994 मध्ये हे उच्चपदावरुन निवृत्त झाल्यावर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. तिन्ही मुलींची लग्नं झाली होती त्यामुळे सगळ्या जबाबदार्या संपल्या होत्या. पुण्यात आल्यावर ह्यांनी चांगल्या कंपनीत नोकरी चालू केली. मला तर खरेच असे वाटायचे की सुख म्हणजे आणखी काय असते? मी देवाला म्हणायची आमच्यासारखे सगळ्यांना सुखी कर.
असे म्हणतात की आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते. तसंच झाले. 1999 साली ह्यांनी नोकरी बंद केली आणि सांगून टाकले की मी आता काहीही करणार नाही. हे वाक्य म्हणजे कुठल्यातरी संकटाची नांदी आहे हे मला त्यावेळी कळले नाही. मला वाटले नोकरी करायची नाही तर ठीक आहे. नाहीतरी साठावे वर्ष होतेच. तेव्हा मी त्यांना सारखे सांगायची की तुम्ही स्वतःला कशात तरी गुंतवून घ्या. तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात जे करायचे असेल त्या गोष्टीत मन रमवा. एखादा छंद जोपासा. परंतु त्यांना काहीच करायचे आहे असे दिसत नव्हते. अनेक गोष्टी सुचवून पाहिल्या पण ते माझ्यावरच चिडायचे, खूप संतापायचे की त्यांना त्यावेळी आवरणेही कठीण व्हायचे. घरातल्या लहान सहान गोष्टीत वाद व्हायला लागले. नंतर हळुहळू घरातल्या प्रत्येक गोष्टीवर, डब्या, बरणीवर त्यातील वस्तूच्या नावाच्या पट्ट्या चिकटवायला सुरुवात झाली. मला हे सगळे विचित्र वाटायचे. मी ह्यांना म्हणायची की मला स्वैपाकघरात चिठ्ठ्यांची गरज नाही आम्हा बायकांना रात्रीच्या अंधारातही वस्तू बरोबर सापडतात. पण ह्यांच चालूच राहिले. आधी खूप राग यायचा पण नंतर स्वतःलाच समजावले की सांगून किंवा वाद घालून काही उपयोग नाही आपल्यालाच सामोपचाराने घ्यायला पाहिजे.
त्यानंतर हळुहळू ह्यांचे चिडणे खूप वाढू लागले. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद व्हायला लागले. माझ्या कामाच्या मध्ये येऊन सारखे सल्ले द्यायला लागले. ऐकले नाही की सारखी चिडचिड. आणि एक गोष्ट म्हणजे त्यांच्या मनासारखे झाले नाही की चिडण्याचा त्यांचा स्वभाव होताच त्यामुळे मला त्यात काही वेगळे वाटले नाही. उलट वाटायचे की सध्या रिकामपण आहे. काही काम नसल्यामुळे त्यांना असे होत असावे. आय़ुष्यात पोकळी निर्माण झाली आहे कशात काहीतरी गुंतवून घेतले की सगळे ठीक होईल.
पण तसे काही झाले नाही. ह्यांची सगळ्याच गोष्टींतून निवृत्ती सुरु झाली. त्याला कारणही घडले त्यावेळी. आमच्या धाकट्या मुलीचा अमेरिकेत घटस्फोट झाला. तिकडून परत आलो तेव्हां त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. मी नको म्हणत होते पण ऐकणे माहीतच नव्हते त्यात त्यांनी प्रचंड आपटी खाल्ली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला आणि सगळ्यातला रसच संपला. प्रत्येक गोष्टीतून अंग काढून घेण्याची सुरुवात झाली. तरी 2008 सालापर्यंत सगळे बरेच चांगले होते. त्यांच्या चिडण्याचीही मला सवय झाली होती. माझीच सहनशक्ती वाढवली.
2009 पासून ह्यांचे विसरण्याचे प्रमाण बरेच वाढू लागले. त्यांचे लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाण हळुहळू कमी झाले. आम्ही अमेरिकेत असलो की हे कॉम्प्युटर वापरायचे. लोकांना इ-मेल करायचे, वर्तमानपत्र वाचून आपली प्रतिक्रिया कळवायचे. पण 2009 पासून एकेक गोष्ट कमी व्हायला लागली. ह्यांनी आमच्या अमेरिकेतल्या मुलीला लिहीलेले पत्र तिला सापडले. ती सांगत होती की बाबांनी दोन वर्षांपूर्वी किती छान पत्र लिहीले आहे. पण आता ते ह्यापैकी काहीच करु शकत नाहीत. टेक्निकल फिल्ड मध्ये काम करत असलेला माणूस त्याला आता काहीच आकलन होत नाही.
2009 मध्ये आम्ही अमेरिकेत असतांना एकदा स्काइप बोलतांना त्यांनी आमच्या मुलीला ओळखले नाही. म्हणजे त्यांना तिचे नाव सांगता येईना आणि तिथेच आम्हा सगळ्यांना धक्का बसला. मग असे दिसायला लागले की बर्याच गोष्टींची नावे त्यांना सांगता येत नाहीयेत. 2008 पर्यंत हे फोनवर बोलत असत त्यानंतर ते ही थांबत गेले. भारतात आल्यावर आम्ही डॉ. कुलकर्ण्यांकडे गेलो. सगळ्या टेस्टस झाल्या आणि cerebral atrophyचे निदान झाले.
आता हे दुखणे असे आहे की मलाच सगळीकडे जमवून घेण्याची गरज आहे असे लक्षात आले की स्वतःची सहनशक्ती जास्त प्रमाणात वाढवणे हाच उपाय आहे. ह्यांना गोष्टीचे आकलन होत नाही. तेव्हा एकच गोष्ट न चिडता 4/5 वेळा सांगायची आणि तरीही लक्षात आले नाही तर सोडून द्यायचे. आता हीच गोष्ट घ्या – फिल्टरचे खालचे भांडे भरलेले असेल तर वरच्या भांड्यात पाणी घालून ते वाया जाते हे अनेक वेळा समजावून त्यांच्या लक्षात येत नाही. रोज तसेच पाणी वाया जाते. आता मी सांगणे सोडून दिले. ह्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. त्यावर ते भाषणे देत. ज्ञानेश्वरीतील दाखले त्यांच्या बोलण्यात नेहेमी असायचे. आता ते ज्ञानेश्वरी वाचतो असे सगळ्यांना सांगतात पण पहिल्या पानावरुन त्यांची गाडी पुढे सरकत नाही. त्यांना शब्दच सापडत नाहीत. संभाषण करणे त्यांना जमत नाही. आम्ही नाटक, सिनेमाला जातो पण ते थोड्याच वेळात कंटाळतात. कारण त्यांना संवाद लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यांना लगेच घरी जायचे असते. आकड्यांचा तर फारच गोंधळ उडतो.
एक गोष्ट मात्र आहे की त्यांना जी गोष्ट आवडते आणि करायची असते ती त्यांच्या बरोबर लक्षात असते. मध्यंतरी त्यांच्या घड्याळांपैकी एक घड्याळ बंद पडले बॅटरी बदलायला हवी होती. त्यांना बॅटरी हा शब्द सांगता येत नव्हता पण घड्य़ाळाच्या दुकानात जाऊन ते बरोबर बॅटरी घालून घड्याळ चालू करुन आले. म्हणजे ह्यांना घड्याळाचे दुकान नीट माहिती होते. मला मात्र ते माहीत नाही.
दोन, तीन महिन्यांपूर्वी पर्यंत हे बॅंकेची कामे करीत असत. एका वेळी एक काम दिले की ते त्यांना करता येत असे. काही दिवसांपूर्वी मला बॅंकेतून निरोप आला की ह्यांना एकट्याला बॅंकेत पाठवू नका. कारण ते असेच बॅंकेत गेले, पैसे काढले ते खिशात ठेवले. नंतर त्यांना ते पैसे सापडेनात आणि ते सर्वांना मला पैसे दिले का म्हणून विचारत बसले.
ह्यांना गाडी चालवण्याची खूप आवड. त्यामुळे गाडी चालवू नका हे सांगितेलेले ते विसरतात. रिक्षाने जायचे म्हटले की प्रचंड थयथयाट असतो. आता तर रिक्षाने जायचे असेल तर ते येतच नाहीत.
खरे सांगायचे तर अशा गोष्टी पावलोपावली घडत असतात. त्याला तोंड देण्यासाठी स्वतः खंबीर होणे खूपच महत्वाचे आहे.
सध्या बरेच सुरळीत चालू आहे.प्रत्येक गोष्टीत थोडा सहभाग दिसतो. शिवाय कधी कधी शाब्दिक विनोद देखील करतात. असे विनोद करण्याचा त्यांचा मुळचा स्वभाव होता. फोनवर किंवा लोकांबरोबर थोडे संभाषणही करतात. हे असेच टिकून राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.