डिमेंशिया म्हणजे काय?
- ज्या व्याधींमुळे स्मृती पुसट होत जाते अशा मेंदूला ग्रासणार्या विविध प्रकारच्या व्याधींच्या लक्षणांना आणि त्यांच्या परिणामांना
- एकत्रितपणे मिळून डिमेंशिया असे म्हटले जाते. ह्या आजारामुळे आजारी व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर, विचारशक्तीवर, वागण्यात,
- स्वभावात आणि त्यामुळे स्वावलंबनावर परिणाम होत जातो. एकदा हा आजार झाल्यावर ह्या आजाराची लक्षणे वाढत जातांना
- दिसतात त्यामुळे ह्या आजाराला इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह आजार म्हटले जाते. लक्षणे वाढत वाढत संपूर्ण मेंदूच आजारग्रस्त होत जातो.
- त्यामुळे मेंदू करत असलेल्या सर्वच कामांवर आजाराचा परिणाम होतांना दिसतो. आजाराच्या शेवटी आजारी व्यक्तीचे जगणे हे पूर्णपणे
- इतरांच्या मदतीने होते.
- डिमेंशिया होण्याची विविध कारणे आहेत. ऑलझायमर्स हे डिमेंशिया होण्याचे एक प्रमुख कारण आहे.
- डिमेंशिया झालेल्या जवळ जवळ सत्तर टक्के व्यक्तींना ऑलझायमर्स झालेला असतो.
- ऑलझायमर्सच्या आजारात मेंदूतील पेशींच्या अवतीभवती आणि पेशींच्या आत नको असलेल्या पदार्थांच्या (प्रोटीन्सच्या) गाठी आणि गुंता होतो.
- ह्यामुळे पेशी आपले ठरवून दिलेले कार्य करायला असमर्थ होतात आणि हळुहळू मृत्युपंथाला लागतात. ह्यामुळे पेशींच्या संवादक्षमतेवर परिणाम होतो.
- मेंदूचा कारभार पेशींमधील संवादावरच अवलंबून असतो. संवाद लुप्त झालेला मेंदूचा भाग त्याला नेमुन दिलेले काम करु शकत नाही.
- जसा हा आजार वाढत जातो तसा मेंदूच्या विविध भागांवर परिणाम होत जातो आणि त्याच्या क्षमता खालावत जातात.
हा आजार किती पसरला आहे?
गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या जागतिक ऑलझायमर्स अहवालानुसार सर्व जगभर पाच कोटी व्यक्ती डिमेंशियाने ग्रासल्या आहेत. ह्या आजाराचे प्रमाण भविष्यकाळात वाढतच जाईल असा अंदाज आहे. त्यानुसार 2030 सालापर्यंत ही संख्या जवळ जवळ साडेसहा कोटी होईल असे मानले जाते. ह्या आजाराचे प्रमाण साहजिकच मध्यम वर्गीय आणि गरीब देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. भारतातही ही संख्या वाढतच जाणार आहे. भारतात डिमेंशियाचे सदतीस लक्ष रुग्ण आहेत असा अंदाज 2010 साली प्रसिद्ध झालेला डिमेंशिया इंडिया रिपोर्ट वर्तवतो. परंतु ही संख्या आता बरीच वाढआजाराचे वाढते प्रमाण, आजाराबद्दल लोकांमध्ये असलेले अज्ञान आणि ह्या संदर्भातील सेवांचा अभाव असे ह्या प्रश्नाचे सध्याचे स्वरुप आहे.
डिमेंशियाची लक्षणे
- डिमेंशियाची लक्षणे सर्वसाधारणपणे एकसारखी असली तरी कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये ती पूर्णपणे सारखी नसतात.
- सुरुवातीची लक्षणे तर कित्येकदा समजूनही येत नाहीत. तरीसुद्धा अलिकडच्या घटना न आठवणे हे बरेच जणांमध्ये दिसून येते.
- संशोधकांच्या निरीक्षणात आलेली सुरुवातीची लक्षणे अशी आहेत.
सुरुवातीची लक्षणे
- स्मरणशक्तीत घसरण
- तोच तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणे
- विस्मरणात झालेली लक्षणीय वाढ
- किंमती वस्तू हरविण्याच्या घटना (एकापेक्षा अधिक वेळा) किल्ली, पाकिट अशांसारख्या रोज लागणार्या गोष्टी परत, परत हरवणे
- स्थळ, काळ, वेळाचे भान कमी
- वर्ष, महिना, तारीख वार हे नेमके माहित नसणे तसेच त्याचा अंदाज करता न येणे
- आपल्या ओळखीच्या परिसरात, नेहेमी जात असणार्या ठिकाणी रस्ता न सापडणे किंवा गोंधळायला होणे आपल्या घरातील व्यक्ती, मित्रमंडळी ह्यांची नावे न आठवणे
नियोजन क्षमता, व्यवस्थापनात उणीवा
- नियोजन करायला लागणार्या छोट्या गोष्टीही न जमणे जसे चार जणांचा स्वैपाक करणे
- महिन्याची बिले वेळेवर भरणे, घराचे व्यवस्थापन संभाळण्यात अडचणी
- व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबाबतच्या व्यवस्थितपणाकडे दुर्लक्ष
- वागण्यात/स्वभावात जाणवण्याएवढा बदल
- एखादी परिस्थिती सर्वसाधारण माणूस हाताळेल त्यापेक्षा वेगळ्या रीतीचे वर्तन उदा. कोणामध्ये न मिसळणे, एकटेच बाजूला जाऊन बसणे
- छोट्या, छोट्या गोष्टींचा मनावर चटकन परिणाम होणे, भावनाविवश होणे
- पटकन रागावणे, चिडणे, आक्रस्ताळेपणा करणे
- गोंगाटामध्ये गोंधळायला होणे, मोठा आवाज सहन न होणे
- तणावपूर्ण परिस्थितीत गांगरुन जाणे
- ज्या गोष्टींमध्ये रस होता, आवडत होत्या त्यांचे आकर्षण कमी होणे उदा. संगीतातील आवड कमी होणे
विचारशक्तीत बदल
- समजूतदारपणा कमी होणे, आडमुठेपणा, हट्टीपणात वाढ
- आकलनशक्ती कमी होणे, नवीन गोष्टी न सुधरणे.
- भाषाकौशल्यात मर्यादा, संवादक्षमतेत अडचणी, चटकन शब्द न आठवणे
- नवीन विषयांवर बोलणे अवघड
- सद्य क्षणाला घडत असलेल्या गोष्टींपलिकडचे भान कमी होणे
- विवेक बुद्धि, सारासार विचारशक्तीचा अभाव
प्रत्येक वृद्ध व्यक्तिला डिमेंशिया नसतो
हा आजार प्रामुख़्याने वृद्ध व्यक्तींना झालेला दिसून येतो. परंतु तरीही हे वृद्धापकाळामुळे होणारे दुखणे नाही. वय वाढल्यावर जसे प्रत्येकाचे केस पांढरे होतात किंवा शरीरावर सुरकुत्या पडतात तसे प्रत्येकाला विस्मृतीचा आजार होत नाही. त्यामुळे हा आजार आणि वृद्धापकाळ ह्याची सांगड घालणे चुकीचे आहे. जसे वय वाढते तसे हा आजार होण्याचे प्रमाण वाढत जाते. उदा. पासष्ट ते चौर्याहत्तर वर्षांमधील व्यक्तींमध्ये ह्या आजाराचे प्रमाण सुमारे दोन टक्के असते तर पंचाहत्तर ते चौर्याऎंशी ह्या वयोगटातील व्यक्तींमध्ये ते प्रमाण सहा टक्क्यांपेक्षा जास्त असते. तसेच ही व्याधी स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा स्वरुपाचे भेदभाव करत नाही.
उपचार
ह्या आजारावर विविध औषधे उपलब्ध आहेत. औषधांचा परिणाम आजाराच्या सुरुवातीच्या काळामध्ये चांगला होतो आणि त्यामुळे मेंदूची क्षमता वाढल्याचे दिसून येते. परंतु हा आजार पूर्णपणे बरा करणारी औषधे सध्या उपलब्ध नाहीत. जगाच्या प्रत्येक कोपर्यात मेंदूच्या ह्या विकारावर संशोधन चालले आहे. लवकरच हा आजार काबूत आणण्यासाठी औषध सापडेल असा आशावाद संशोधकांमध्ये आहे.
पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये विस्मृतीचा आजार झालेल्या व्यक्ति आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी काम केले जाते. हा आजार अनेक वर्षे रेंगाळणारा असल्याने आजाराच्या विविध स्थितींमधुन जातांना आजारी व्यक्तीची कशी काळजी घ्यावी ह्याबाबत मेमरी क्लिनिकमध्ये मार्गदर्शन मिळते. क्लिनिक मार्फत आजारी व्यक्तींसाठी महिन्यातून दोन वेळा मेमरी लॅब चालविली जाते. त्यामध्ये मेंदूच्या घसरणीचा वेग कमी करण्यासाठी तसेच त्याच्या क्षमता टिकवण्यासाठी व्यायाम करवून घेण्यात येतात. ह्याचबरोबर तेजस नगर विरंगुळा केंद्र, कोथरुड येथे दर महिन्याच्या दुसर्या रविवारी दुपारी चार ते सहा ह्या वेळात ऑलझायमर्स सपोर्ट ग्रुपची मिटींग घेण्यात येते.
मेमरी क्लिनिक
मंगला जोगळेकर,
न्युरॉलॉजी विभाग,
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे