या आमच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजी, धन्वंतरी हॉल, एरंडवणे, पुणे, येथे झालेल्या कार्यक्रमाला छान प्रतिसाद मिळाला.
डॉ. हिमांशु वझे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काळजी घेणारा आणि काळजी देणारा या दोघांचं नातं अद्वैताचं आहे. माणसाची सेवा करण्याची वृत्ती निसर्गतः असली तरी काळजी घेण्याचा कस लागल्यावर सगळी समीकरणे बदलत जातात. त्यामुळे मनामध्ये उलथापालथ घडत राहते. परंतु जेव्हा वरच्या शक्तीवरच्या विश्वासाचा आणि अध्यात्माचा धागा मनाला मजबुतीसाठी लाभतो, त्यावेळेला आपोआप कणखरपणा येत जातो. रोज येणाऱ्या आव्हानांकडे रडत, चिडत, नशिबाला दोष देत न बघता सहजपणे स्वीकारण्याची वृत्ती वाढत जाते. ही बदललेली दृष्टी सेवा करण्याची ताकद वाढवते आणि त्याची प्रतही वाढवते. अनेकांचे अनुभव आपल्याला हेच सांगतात.
दीनानाथ हॉस्पिटलचे मेमरी क्लिनिक आणि अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप, पुणे गेली सोळा वर्षे डिमेन्शिया रुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी काम करते आहे. त्याचबरोबर हा आजार शक्यतोवर आपल्यापासून दूर राहावा आणि झालाच तर त्याचे निदान योग्य वेळी व्हावे म्हणून प्रयत्नशील आहे.
मंगला जोगळेकर







