परवा डॉ. मंगला जोगळेकर यांचे व्याख्यान झाले. मंगलाताईना मी ‘दीनानाथ’मध्ये भेटलो होतो. तेव्हाही जाणवली होती ती त्यांच्यातील सकारात्मकता. परवाच्या व्याख्यानात तीच गोष्ट ठळकपणे उठून दिसली. खरं तर विस्मरण ही अलीकडे वारंवार ऐकू येणारी गोष्ट. त्याबद्दलच्या काही अस्वस्थ करणाऱ्या कथाही आपण ऐकत असतो. मात्र मंगलाताईंनी सुरुवातीलाच सर्वसाधारणपणे वयोमानानुसार येणारे विस्मरण आणि डिमेंशिया यातला फरक सांगून मनातली भीति घालवून टाकली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या प्रत्येक वेळी उपाय सांगत होत्या. माणसाला नैराश्य येतं, ते कुठलाही उपाय दिसत नाही तेव्हा. मंगलाताईंच्या बोलण्यात मात्र प्रत्येक पायरीवर उपाय होता.
त्याबरोबरच त्यांनी कसलेही अवाजवी दावे केले नाहीत. पार्किंसन्स काय किंवा डिमेंशिया काय, या आजारांशी मैत्री करून त्यासोबत राहावे लागते, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले. त्यानंतर आपले आयुष्य चांगले जावे, त्याचा दर्जा चांगला असावा यासाठी त्यांनी विविध उपाय सुचवले. या उपायांमध्ये एक महत्वाची बाब समान दिसत होती. ती म्हणजे मेंदूला नवनवीन काम देणे, आव्हान देणे.
मंगलाताई म्हणाल्या की, ‘तुम्ही रिटायर्ड झालात तरी चालेल. मात्र मेंदूला रिटायर्ड होऊ देऊ नका.’ हे वाक्य मला त्यांच्या संपूर्ण व्याख्यानाचा अर्क आहे, असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे विस्मरणावर उपाय करायचा असेल तर आत्मविश्वास हवा आणि उपायांमध्ये सातत्यही हवं, असे त्या म्हणाल्या. हा फार महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. कारण अनेकदा उपाय समोर जरी असला, तरी माणसे करण्याचा कंटाळा करतात.
उदाहरण द्यायचं झालं तर आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी निरनिराळे क्रमांक लक्षात ठेवण्याचा व्यायाम त्यांनी सुचवला. त्यांच्या मेमरी क्लब मध्ये आलेल्यांनी संपूर्ण भगवदगीता पाठ केल्याचं त्यांनी उदाहरणही दिलं. त्याशिवाय नवीन कला शिकणे, भाषा शिकणे, नवी रेसिपी शिकणे, अशासारख्या असंख्य गोष्टीतून आपण मेंदूला चॅलेंज देत असतो आणि त्याला जास्तीत जास्त कार्यान्वित करत असतो हे त्यांनी अधोरेखित केलं. मात्र मेंदूला काम द्यायचं म्हणजे त्याला थकवायचं असा अर्थ होत नाही, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. मल्टीटास्किंग करू नये, हे त्यांनी आवर्जून सांगितलं.
मला त्यांच्या व्याख्यानातील दोन गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे विस्मरणाच्या कुठल्याही पायरीवर काहीनाकाही उपाय करून माणसाचं आयुष्य जास्तीत जास्त सुकर कसं होईल याचा प्रयत्न आपण करायला हवा आणि तसा तो बऱ्याच अंशी करता येतो. या उपायांनी नुसत्या आजार असलेल्या माणसालाच नव्हे तर त्याच्या काळजीवाहकालाही बरे वाटते. त्याचाही ताण हलका होतो. दुसरे म्हणजे सर्वसाधारण विस्मरण हे वयोमानानुसार होणे हे नैसर्गिक असते. मात्र त्यावर काही उपाय करून आपण मात करू शकतो. ही बाब मला फार आशादायक वाटली.
एकंदरीतच मंगलाताईंचे परवाचे व्याख्यान हे साधे आणि सोप्या भाषेत होते. मात्र फार प्रभावी आणि मनात आशेचा दिवा लावून गेले.
अतुल ठाकूर (मे, २०२५)
