सप्टेंबर हा अल्झायमर जनजागृतीचा महिना मानला जातो. त्याचे औचित्य साधून अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप, पुणे मार्फत सिंहगड रोडवरील सन सिटी सोसायटी मध्ये 26 सप्टेंबर रोजी अल्झायमर जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात एका पथनाट्याने झाली. आजाराच्या बदलत्या स्थिती आणि प्रश्न यांचे वास्तवच पथनाट्याने डोळ्यासमोर उभे केले. डॉ.मंगलताई जोगळेकर ह्यांनी ह्या आजाराबद्दल माहिती देताना गंभीर विस्मरण आणि साधे विस्मरण ह्यामधील फरक विषद केला. गंभीर विस्मरण अर्थात डिमेंशिया आजाराच्या दिशेने जाणाऱ्या विस्मरणाच्या लक्षणांची तसेच डिमेंशिया रुग्णाची काळजी घेणे कसे वेगळे आहे याची माहिती दिली. त्याचबरोबर मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो याची विस्तृतपणे चर्चा केली. त्यानंतर प्रश्न आणि उत्तराचे सत्र घेण्यात आले.
ह्या कार्यक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्यावरून असे लक्षात येते की लोकांना हळूहळू त्या आजाराबद्दल माहिती मिळवणे गरजेचे वाटत आहे.










